औरंगाबाद : एकाच दोरीने गळफास घेऊन एका प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यातील जळकी बाजार येथे ही घटना घडली. प्रेयसीच्या शेतातील झाडाला गळफास घेऊन दोघांनी आपलं आयुष्य संपवलं.
औरंगाबादेतील प्रेमी युगुलाने एकाच झाडाला एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी पहाटे 5 ते 6 वाजताच्या सुमारास दोघांनी एकत्र आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या घटनेची माहिती अजिंठा पोलिसांना मिळताच घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित विसपुते हे आपल्या कर्मचाऱ्यांसह गेले. त्यांनी मृतदेहांचा पंचनामा करुन दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आजिंठा येथील आरोग्य केंद्रात दाखल केले आहेत.
नेमकं काय घडलं?
सकाळपासूनच युवती घरात दिसत नसल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घ्यायला सुरुवात केली. पण तरीही तिचा काहीही थांगपत्ता लागत नव्हता. अखेर शेतात जाऊन पाहणी केली असता युवती आणि युवक बांधावरील एका झाडाला एकाच दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे.