जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील सावखेडा शिवारातील एका शेतात कुजलेल्या अवस्थेत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत शेतकरी यांच्या खबरीवरून तालुका पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पिंप्राळा परिसरातील रहिवासी एकनाथ पांडुरंग घायदार वय ७० यांचे सावखेडा शिवारात गट नं येथे आर्यन पार्कच्या मागील बाजूस गट नं २७५ येथे शेती आहे. एकनाथ घावदार काल नेहमीप्रमाणे शेतात गेले असता त्यांना शेतात एका बाजुला अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसून आला.
मयताचे वय अंदाजे ५० ते ६० वर्ष असून त्याच्या अंगात लांब बाह्याचा फिकट राखाडी रंगाचा शर्ट व कमरेला काळ्या रंगाची पँट दोरीने बांधलेली असे त्याचे वर्णन होते. तो भिकारी असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात शेतकरी एकनाथ घावदार यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल मोरे करीत आहे.