बोदवड प्रतिनिधी | अनेकदा मोबाईल हँडसेटचा स्फोट झाल्याच्या घटना घडत असतात. विशेष करून दीर्घ काळापर्यंत स्मार्टफोनचा वापर केल्याने त्याच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने युजर जखमी होत असतात. अशीच एक घटना बोदवड तालुक्यातील शेलवड येथे घडली आहे. मोबाईलवर गेम खेळत असताना बॅटरीचा अचानक स्फोट झाल्याने १० वर्षीय बालक जखमी झाला आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, मूळचा भुसावळ तालुक्यातील सुसरी येथील चेतन प्रफुल्ल पाटील ( वय १०) हा बालक दिवाळीच्या सुटीनिमित्त बोदवड तालुक्यातील शेलवड येथे आपल्या मामाच्या घरी गेला होता. आज दुपारी मोबाईलवर गेम खेळत असतांना हँडसेटमधील बॅटरीचा अचानक स्फोट झाला. यामुळे चेतनच्या हाताला इजा झाली आहे.
त्याला डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेमुळे मोबाईलच्या वापरातील धोका हा पुन्हा एकदा अधोरेखीत झाला आहे.