फिरोजाबाद : देव दर्शन करून घरी परतणाऱ्या कुटुंबियांवर काळाने घाला घातला. अपघातात एकाच कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू झाला आहे. हरियाणाच्या बहादूरगड येथे हा भीषण अपघात झाला आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, फिरोजाबादच्या सिरसागंज तालुक्यातील नगला गावात शिव कुमार कुटुंब दरवर्षी बाबा जाहरवीर यांच्या जन्मस्थळी गोगामेडी येथे दर्शनासाठी जातं. घरातही प्रत्येक आठवड्याला बाबा जाहरवीर यांची पूजा केली जाते. अनेकदा कुटुंबाने गोगामेडी दर्शनानंतर पूजेचं आयोजन केले होते. परंतु यंदा हे कुटुंब पुन्हा परतणार नाही याची कुणालाही जाणीव नव्हती. २० ऑक्टोबरच्या संध्याकाळी सिरसागंज गावातील नगला अनूप येथून गोगामेडी येथे गेले होते. शिवकुमार कुटुंबाच्या गाडीत पत्नी मुन्नी देवी. मुलगा मनोज, सून रुबी, मुलगी खुशबू, मआरती, नात वंशिका, प्रांशु, सोनादेवी, प्रियांशी, आरती यांच्यासह आणखी १ व्यक्ती होता. कार मोनू नावाचा ड्रायव्हर चालवत होता.
गुरुवारी दर्शनानंतर सर्व लोक घरी परतत होते. तेव्हा वाहनचालक मोनूने बाथरुमला जाण्यासाठी गाडी एका ढाब्याजवळ ट्रकच्या मागे उभी केली. त्याचवेळी आरती गाडीबाहेर येऊन उभी राहिली. तेव्हा अचानक पाठीमागून नियंत्रण सुटलेला ट्रक गाडीला येऊन जोरदार धडकला. या दुर्घटनेत शिवकुमारसह घरातील ८ सदस्यांचा मृत्यू झाला तर २ वर्षाची आंशी गंभीर जखमी झाली. आरती आणि मोनू कारच्या बाहेर असल्याने त्यांचा जीव बचावला. अपघातात एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली. अपघातानंतर गावातील काही जण तातडीने दुर्घटनास्थळी रवाना झाले. या अपघाताने गावातील प्रत्येकाचं मन हेलावून टाकलं आहे. सणासुदीच्या ऐन काळात लोकांमध्ये दु:खाचं वातावरण पसरलं आहे. गावात दिवाळीही साध्या पद्धतीने साजरी केली जाईल अशी माहिती गावातील सरपंच अभिषेक यांनी दिली. या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकप्रतिनिधींनी गावकऱ्यांसह पीडित कुटुंबातील नातेवाईकांची भेट घेतली.