अमरावती : अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा तालुक्यात एका १७ वर्षीय विद्यार्थिनीने शिक्षणासाठी पैसे नसल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सेजल जाधव असं या मुलीचं नाव आहे. तिच्या आत्महत्येनंतर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत्यूपूर्वी सेजलने चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यात आई, वडिलांवर ओझे नको म्हणून जीवन संपवत असल्याचे तिने लिहिले आहे.
सेजलने मृत्युपूर्वी १८ तारखेला सुसाइड नोट लिहून ठेवली होती. ‘मी सेजल गोपाल जाधव आत्महत्या करणार आहे. माझ्या घरची परिस्थिती खूपच हलाखीची आहे. माझ्या घरामध्ये आम्ही सहा जण राहतो. फक्त माझी आई कामाला जाते. आमच्यावर खूप कर्ज आहे. आम्हाला राहण्यासाठी जागा थोडीशी आहे. माझा भाऊ लहान आहे. माझी आई कर्ज काढून आम्हाला शिकवते. माझ्या शेतामध्ये तीन वर्षे झाली उत्पन्न खूप कमी येतेय. माझे बाबा खूप काम करतात. मी इयत्ता बारावीमध्ये आहे पण अॅडमिशन फी भरण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत. मी खूप दिवसांपासून तणावाखाली आहे.
आर्थिक परिस्थितीला कंटाळून मी स्वतःहून आत्महत्या करते आहे’, असे यात तिने नमूद केले आहे. माझे आई बाबा माझ्यावर खूप प्रेम करतात. मी पण माझ्या आई वडिलांवर खूप प्रेम करते. मला कॉलेजमध्ये काही विषय समजत नव्हते. कॉलेजला जाण्यासाठी युनिफॉर्मही नाही. माझ्या बहिणीने माझ्यासाठी शाळा सोडली. ती कामाला जाते. या सगळ्यामुळे मी तणावाखाली आहे आणि नापास होण्याचीही भीती वाटत असल्याने मी माझे जीवन संपवत आहे, असेही सेजलने नोटमध्ये पुढे लिहिले आहे.