एरंडोल : येथे म्हसावद रस्त्यावर शहरापासून तीन किलोमीटरच्या अंतरावर रस्त्याच्या साईडला आजीचा हात पकडून जात असलेल्या सात वर्षीय बालकास भरधाव वेगाने जाणार्या बोलेरो या वाहनाने जोरदार धडक दिली. त्यात सात वर्षीय बालकाचा जागेवरच मृत्यू झाला होता. तर बोलेरो गाडी घेऊन म्हसावद कडे पळुन जात असतांना त्यांचा 8 किलोमीटर पाठलाग करत शेवटी रस्त्यावर ट्रॅक्टर ट्रॉली आडवे करून त्या बोलेरो वाहनास थांबवण्यात आले. व बोलेरो वाहन व चालक यास पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
येथील भवानी मातेच्या मंदीरातील धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर उमर्दे येथे सखुबाई, अरूणाबाई व मंगा नाईक हे पवन रावसाहेब सोनवणे (वय ७वर्षे)याचा हात धरून पायी चालत असताना एम.एच.१९ बी.यू ६९०३ क्रमांकाच्या बोलेरो गाडीने पवनला ठोस दिली. पवनला जोरदार ठोस दिल्यानंतर बोलेरो गाडीचा चालक घटनास्थळी न थांबता म्हसावद कडे वेगाने निघुन गेला. मंगा नाईक यांच्या परीवाराने आरडा-ओरड केल्यावर संदीप पाटील, योगेश पाटील, संजय महाजन यांनी दुचाकीने जाऊन वाहनाचा पाठलाग केला व सदरील बोलेरो गाडी अडवुन चालकासह एरंडोल पोलिस स्टेशन ला नेण्यात आली.
दरम्यान, पवनला धडक दिल्यानंतर तो काही एक हालचाल करीत नव्हता म्हणून त्याला ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ नेण्यात आले, तो मृत झाल्याचे तपासाअंती घोषित करण्यात आले. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशन ला बोलेरो चालक मनोज मोहन राठोड रा.ढेकू तांडा ता. अमळनेर याचे विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हेड काँन्स्टेबल संतोष चौधरी व विलास पाटील हे पुढील तपास करीत आहेत.