चोपडा : चोपडा तालुक्यातील धानोरा येथील अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर असलेल्या इंडीकॅश बँकेचे एटीएम मशीन फोडता आले नसल्याने चोरांनी चक्क एटीएम मशीनचीच चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार मध्यरात्री घडला आहे.
याबाबत असे की, धानोरा येथील ग्रामपंचायत शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये असलेल्या इंडीकॅश बॅंकेचे एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी पळविले आहे. पैसे चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या अज्ञात चोरांना एटीएम फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यामुळे चोरांनी चक्क एटीएम मशीनच चोरुन नेले. ही घटना बुधवारी (ता.२०) मध्यरात्री घडली.
एटीएम मध्ये अंदाजे दीड दोन लाख रुपयांची रक्कम असल्याचे समजते. तर जवळपास असलेल्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये रात्री दोन वाजेच्या सुमारास एक मोठा ट्रक या रस्त्यावरून गेल्याचे दिसत असल्याने यातच एटीएम मशीन टाकून नेले असावे असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अडावद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण दांडगे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.