जळगाव : ना हरकत दाखला देण्याच्या मोबदल्यात ४ हजाराची लाच मागणाऱ्या जळगाव जिल्हा निबंधक कार्यालयातील कनिष्ठ लिपिक विनोद रमेश सोनवणे (46, रा.रीधुर वाडा, शनीपेठ, जळगाव) यांना जळगाव एसीबीच्या पथकाने आज बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास अटक केली. त्याच्याविरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत असे कि, जळगाव शहरातील 46 वर्षीय तक्रारदार हे जळगाव शहरातील निमखेडी शिवारात असलेली रुद्र गृहनिर्माण सहकारी संस्थेमधील सदनिका खरेदी करणार असल्याने त्यांनी सदनिका खरेदीकामी जळगाव सहकारी संस्थेच्या कार्यालयाकडील ना-हरकत दाखला/संमती पत्र आवश्यक होते. त्यांनी संशयीत आरोपी तथा कनिष्ठ लिपिक विनोद रमेश सोनवणे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी काम करून देण्यासाठी 15 सप्टेंबर 2021 रोजी पाच हजार रुपये लाचेची मागणी करीत तडजोडीअंती चार हजार रुपये स्वीकारण्याचे कबुल केले. तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवली.
सापळा रचण्यात आल्यानंतर विनोद सोनवणे यांना संशय आल्याने त्यांनी लाच स्वीकारली नाही मात्र लाच मागितल्याचे सिद्ध झाल्याने व पुरावा प्राप्त झाल्याने त्यांना बुधवारी दुपारी अटक करण्यात आली व बुधवारी रामानंद नगर पोलिसात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.