रायगड : मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर सहा वाहने एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले असून ६ जण जखमी झाले आहेत. यामध्ये कोबंडी वाहुन नेणाऱ्या टेम्पो आणि ट्रेलरमध्ये स्वीफ्ट कारचा चक्काचूर झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात आकुर्डी येते झाला. पुण्याहून मुंबईकडे भरधाव वेगात जाणाऱ्या एका टेम्पो चालकाचे येथील तीव्र उतारावर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा टेम्पो भाजीची वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोवर मागून जोरात आदळला. त्या धक्क्यानं भाजीचा टेम्पो पुढच्या कारवर आदळला. टेम्पोच्या धडकेने ही कार कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर मागून आदळली तर तो कोंबड्याचा टेम्पो पुढे एका प्रवासी बसवर जोरात आदळला.
तसेच दुसरी एक हुंदाईची कार कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर आदळल्यावर ती कार मागून येणाऱ्या ट्रेलर आणि कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोच्या मध्ये चिरडली गेल्याने हुंदाई कारचा चालक, अन्य एकजण आणि कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा चालक असा तिघांचा जागीच मृत्यू झाला असून, सहा जण जखमी झाले आहेत.