पंढरपूर : मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नसल्याने कर्मचारी तणावात आहेत. त्यातूनच अनेक ठिकाणी आत्महत्यांचे सत्र सुरू झाले आहे. अशातच आज पंढरपुरातील यांत्रिक विभागात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने एसटी विभागामध्ये खळबळ उडाली आहे.
पंढरपूर येथील एसटी आगारातील दशरथ गिड्डे या कर्मचाऱ्याने राहत्या घरी आज पहाटे गळफास लावून आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाहीये. दशरथ गिड्डे हे पंढरपूर येथील एसटी आगारात यांत्रिकी विभागात गेल्या अनेक वर्षापासून काम करत होते. आज पहाटे त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे.
दशरथ गिड्डे यांच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुले आहेत. मूळचे मोहोळ येथील असलेले गिड्डे मागील काही दिवसांपासून मानसिक तणावामध्ये होते. त्यातूनच त्यांनी ही आत्महत्या केली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.