चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील पाटणादेवी मंदीर परिसरातील धवलतीर्थ धबधब्याखाली आंघोळ करण्यासाठी गेलेल्या २० वर्षीय तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवारी दुपारी घडली. राहूल सुखदेव पवार (वय-२०रा. डोंगरगांव, राज्य मध्यप्रदेश ) असे मृत तरुणाचे नाव असून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसापासून चाळीसगाव तालुक्यात पावसाने थैमान घातले. पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहत आहे. तालुक्यातील पाटणा शिवारात धवल तीर्थ धबधब्याखाली आंघोळ करण्यासाठी गेलेल्या राहूल सुखदेव पवार (वय-२०) रा. डोंगरगांव, राज्य मध्यप्रदेश या तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर मृतदेहाला चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहे.
पाटणा गावाचे पोलिस पाटील यांच्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास ओंकार सुतार हे करीत आहेत.