मुंबई : मुंबईतील आरे कॉलनी परिसरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या दोन नेत्यांना २० हजाराची खंडणी घेताना पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. सूर्यप्रकाश भदर्गे (उपाध्यक्ष मुंबई, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया) आणि रेखाताई मोरे (जिल्हा उपाध्यक्ष उत्तर-पश्चिम मुंबई, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.
या दोन्ही खंडणीखोर आरोपींनी आरे कॉलनीमध्ये एका रेशनिंगचा दुकानाचे शिफ्टिंग असल्यामुळे दुकानदाराकडून 1 लाख 35 हजार रुपयांची मागणी केली होती, मात्र 20,000 रुपये घेताना आरे पोलिसांनी त्यांना रेड हँड अटक केली आहे.
आरे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता या दोन्ही खंडणीखोर नेत्यांनी आरे परिसरामधून मोठ्या संख्येने लोकांकडून खंडणी घेतल्याची माहिती समोर आली आहे. अटक केलेल्या आरोपींचे आणखी काही साथीदार आहेत का? याचा शोध आरे पोलीस घेत आहेत.