जळगाव प्रतिनिधी | जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार असलेला सराईत गुन्हेगार मंगळवारी पहाटे शहरात बेकायदेशीरपणे फिरताना मिळून आला. शनिपेठ पोलिसांनी त्याला अटक करुन गुन्हा दाखल केला आहे. सागर उर्फ झंपऱ्या आनंदा सपकाळे (वय २४, रा. कोळीपेठ) असे या गुन्हेगाराचे नाव आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या आदेशानुसार शनिपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक बळीराम हिरे, पोलीस उपनिरिक्षक सुरेश सपकाळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल परीस जाधव, गिरीश पाटील, राहूल घेटे, राहूल पाटील यांच्या पथकातर्फे मंगळवार, ३१ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास शनिपेठ पोलीस स्टेशन हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले.
या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान बालाजी मंदिराजवळ रोडवर सागर उर्फ झंपर्या आनंदा सपकाळे वय २४ रा. कोळीपेठ हा हद्दपार आरोपी मिळून आला. त्याच्याकडे कुठलीही परवानगी नसल्याचे चौकशीत मिळून आले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राहूल घेटे यांच्या फिर्यादीवरुन आरोपी सागर उर्फ झंवर्या याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरिक्षक बळीराम हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही सुरु आहे.