कापडणे प्रतिनिधी | धुळे तालुक्यातील नगाव येथील शेतकरी सुदाम बाळू पाटील (वय ४२) यांचा मुलीच्या वाढदिवशीच शेतात असलेल्या विहिरीत पडून मृत्यू झाला. पाणी काढताना ते पाय घसरून पडले.
शेतकरी सुदाम पाटील हे शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास फवारणी करत होते. ते पाणी काढण्यासाठी विहिरीजवळ गेले. त्या वेळी पाय घसरून विहिरीत पडले. पण पोहता येत नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. आजूबाजूला असलेल्या शेतकऱ्यांच्या ही बाब लक्षात त्यांनी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत सुदाम पाटील यांचा मृत्यू झाला होता. सोनगीर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. तरुणांनी पोलिसांच्या मदतीने सुदाम पाटील यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. त्यांच्यावर नगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ते कुटूंबातील कर्ते पुरुष होते.
मुलीसाठी नवीन कपडे
सुदाम पाटील यांची नववीतील मुलगी सानिका हिचा शुक्रवारी वाढदिवस होता. त्यासाठी चार दिवस आधीच सुदाम पाटील यांनी मुलीला धुळे शहरातून कपडे व विविध साहित्य आणले होते. गावातील एका मुलीकडे केकसाठी त्यांनी शेतात जाण्यापूर्वी ऑर्डरही दिली होती. मात्र, वाढदिवस साजरा करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.