बुलडाणा : ट्रक भरधाव वेगाने जालनाकडे जात असताना एसटी बसला क्रॉस करत एक बाजूने पूर्णपणे फाडत नेले. त्यामुळे एक वृद्ध महिला जागीच ठार झाली. बसमधील १८ प्रवासी जखमी झाल्याची घटना बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा बायपासवर घडली.
गंभीर जखमी रुग्णांना जालना येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे तर उर्वरित जखमी प्रवाशांवर देऊळगाव राजा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर बस जालनावरून देऊळगाव राजाकडे येत होती तर ट्रक हा जालनाकडे जात असताना हा अपघात घडला आहे. या अपघातात बसच्या काही भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला. या अपघातात एका वृद्ध आजीचा जागीच मृत्यू झाला.
तर बसमधील 18 प्रवासी जखमी झाले आहेत. संबंधित घटना आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली. ट्रक आणि बस यांच्या अपघाताचा आवाजही मोठा आला. हा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी दाखल झाले. तसेच महामार्गाने जाणारे अनेकजण घटनास्थळी थांबले. यावेळी सर्व प्रवाशांना बसच्या बाहेर काढून त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यासाठी प्रयत्न केले आहेत.