भुसावळ प्रतिनिधी | सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून, याचा फटका चक्क आमदार संजय सावकारे यांना बसला आहे. आ.सावकारे यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट उघडून यावरून अनेकांना पैसै मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. आ. सावकारे यांनी स्वत: फेसबुक अकाऊंटसह विविध व्हाटसऍप ग्रुपमध्ये याबाबतची माहिती जाहीर केली आहे. दरम्यान, त्यांनी सतर्कता दाखविल्याने हे अकाऊंट आता ब्लॉक करण्यात आले आहे.
अलीकडच्या काळात फेसबुक अकाऊंट हॅक करून वा बनावट अकाऊंट तयार करून यावरून फ्रेंड यादीतील मंडळकडून इनबॉक्समधून पैसे मागण्याचे प्रकार घडत आहेत. त्यातच आता आ.सावकारे यांच्या नावाने बनावट अकाऊंट तयार करून याद्वारे मित्रांच्या यादीतील लोकांकडून पैशांची मागणी करण्यात येत असल्याचा प्रकार घडला आहे.
आमदार संजय सावकारे यांनी स्वत: फेसबुक अकाऊंटसह विविध व्हाटसऍप ग्रुपमध्ये याबाबतची माहिती जाहीर केली असून त्यांनी याबाबत फेसबुककडे तक्रार केली. यामुळे काही तासांमध्येच हे बनावट अकाऊंट आता ब्लॉक करण्यात आले.