जळगाव प्रतिनिधी : जळगाव भुसावळ महामार्गावरील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या द्वितीय वर्षात एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. वैष्णवी किशोर लोखंडे (वय-२२) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.
वैष्णवी लोखंडे ही समर्थ कॉलनी, एम जे कॉलेज पाठीमागे राहते. वैष्णवी अभ्यासामध्ये हुशार होती. ती नेहमी सर्वांशी मनमिळावूपणे वागायची, असे तिच्या मित्र-मैत्रिणींनी सांगितले. दरम्यान, तिला परीक्षांमध्ये कमी मार्क पडले होते, त्यामुळे ती काहीशी नाराजी होती. त्यामुळे तिने आत्महत्या केली असावी अशी चर्चा मित्र-मैत्रिणींमध्ये आहे.
तिचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आला आहे. सीएमओ डॉ. नीता भोळे यांनी तिला तपासून मृत घोषित केले. दरम्यान मुलीने आत्महत्या केल्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला आहे. याबाबत पुढील तपास रामानंद नगर पोलीस करीत आहे. मयत वैष्णवीच्या पश्चात आई, वडील व लहान भाऊ आहे.