पारोळा प्रतिनिधी : पारोळा-कासोदा रस्त्यावरील मोरफळ-मंगरूळ गावांदरम्यान दुचाकीला मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत शालक दीपक मंगा भील (वय ३०) मेहुणा लक्ष्मण बबन भील (वय २७) या दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल गुरुवारी घडली.
याबाबत असे की, पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथील शालक व मेहुणा हे दोघे टीव्हीएस दुचाकीला (क्र.एम.एच.१९-आर-०७२६) ने उसतोड मुकादमाकडे मजुरीचे पैसे घेण्यासाठी कासोदा येथे दुचाकीने जात होते.
वाटेत मोरफळ ते मंगरुळदरम्यान समोरून येणाऱ्या टाटा मॅजिक वाहन (क्र.एम.एच.२०-बी.वाय.३०८५) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांना जबर मार लागल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. या घटनेचा हवालदार विजय भोई, सुनील वानखेडे, राहुल पाटील यांनी पंचनामा केला.
दरम्यान, दुचाकीला धडक दिल्यानंतर टाटा मॅजिक वाहनाचा चालक घटनास्थळावरून पसार झाला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. अतिवेगामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.