जळगाव/पुणे प्रतिनिधी : पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी सुनील झंवर यास काल मंगळवारी नाशिकमधून अटक केली होती. दरम्यान, झंवरला आज पुण्याच्या विशेष न्यायालयात हजर केले असता त्याला ९ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
भाईचंद हिराचंद रायसाेनी (बीएचआर) पतसंस्थेत सुमारे ११०० काेटींच्या घाेटाळा प्रकरणात तब्बल नऊ महिन्यांपासून पाेलिसांना गुंगारा देणाऱ्या सुनील झंवर यास मंगळवारी (दि. १०) सकाळी नाशकातील पंचवटी भागातून सापळा रचून अटक करण्यात आली. १० दिवसांपासून पथक तेथे तळ ठोकून होते. पथकाला झंवर वापरत असलेल्या कारचीही माहिती मिळाली होती. पंचवटीत महालक्ष्मी थिएटरमागे त्याच्या नातलगाच्या बंगल्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त पथकाच्या हाती लागले. तेव्हापासून पथकाने बंगल्याच्या सभाेवताली सापळा रचला.
पथकातील दाेघांनी त्यांच्या बंगल्यात प्रवेश केल्याचे झंवरला लक्षात येताच त्याने गॅलरीतून खाली उडी मारून तारेच्या कुंपणावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकाने आधीच या सर्व ठिकाणी सापळा लावून ठेवल्याने ताे उडी मारताच त्यास ताब्यात घेतला.
दरम्यान, आज झंवरला न्यायालयात हजर केले असता त्यास ९ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.