पहूर, ता.जामनेर : दोन दुचाकी एकमेकांना धडकल्या झालेल्या अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी झाला. शेंदुर्णी ते गोेंदेगाव दरम्यान ऋषी मंदिर परिसरात महामार्गावर ही घटना घडली आहे. दरम्यान, अपघातातील जखमींचे मृतदेह व जखमी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दीपक रामदास गायकवाड (वय २५, रा. गटामरी, ता. सिल्लोड, औरंगाबाद) व दिनेश मदन जाधव (वय २३, रा. गोंदगाव तांडा, शेंदुर्णी) असे मृतांची नावे आहेत. तर कृष्णा उत्तम सोनवणे (रा. डकला, ता. सिल्लोड, औरंगाबाद) असे जखमीचे नाव आहे.
मृत दीपक व जखमी कृष्णा हे दोघे एकमेकांचे आतेभाऊ-मामेभाऊ आहेत. हे दोघे दुचाकीने (एमएच २० डीके २५४८) रविवारी दीपकची बहीण राधाबाई (जोगलखेडा) हिला भेटण्यासाठी आले होते. परत जात असताना त्यांच्या दुचाकीची धडक दिनेश जाधव याच्या दुचाकीला बसली. या अपघातात दीपक व दिनेश या दोघांचा मृत्यू झाला. तर कृष्णाच्या डाव्या पायास व डोक्यास दुखापत झाली. नागरिकांनी या तिघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, शेंदुर्णीजवळच्या अपघातातील मृतांच्या नातेवाइकांनी प्रचंड आक्रोश केला. रात्री ११.३० वाजता दोन्ही मृतदेह शवागारात नेण्यात आले होते.