नंदुरबार, (प्रतिनिधी) : येथील यशवंत विद्यालयाचे माजी प्राचार्य डी.डी.पाटील (डी.डी.मामा) यांचे हृदयविकाराने निधन झाल्यानंतर काल प्रकाशा येथे त्यांची लहान मुलगी शितल पाटील हिने वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी देत आपले उत्तरदायित्वच पार पाडले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहादा तालुक्यातील वाघोदा येथील रहिवासी असलेले कै. डी.डी.पाटील हे नंदुरबार येथे यशवंत विद्यालयातून सन २०१४ साली प्राचार्य पदावर असतांना सेवानिवृत्त झाले होते. त्यांना तीन मुली असून एकही मुलगा नाही. तीनही मुली स्मिता गजानन बेहेरे, मुक्ता निलेश पाटील आणि शितल विलास पाटील या उच्चशिक्षित आहेत. स्व.डी.डी.पाटील दि. २१ जुलै रोजी सकाळी ते आपल्या नागपूर येथे वास्तव्यास असलेल्या मुलगी स्मिता, जावई डॉ गजानन बेहेरे व नातू सिद्धार्थ यांना भेटायचे म्हणून नंदुरबार येथुन हावडा एक्स्प्रेसने नागपूरकडे निघाले. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ते नागपूरला पोचले. तेथील रेल्वे स्थानकावरून जावई डॉ गजानन बेहेरे व नातू सिद्धार्थ असे तिघे जण घराकडे जायला निघाले असता वाटेतच त्यांना मळमळ होऊन त्रास जाणवू लागला.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जावई डॉ बेहेरे यांनी त्यांची गाडी थेट इस्पिटलाकडे वळवली. जवळच्या मल्टीस्पेशालिटी इस्पितळात त्यांना नेले. त्याठिकाणी त्यांची तपासणी केली असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषीत केले. त्यानंतर सर्व कायदेशिर सोपस्कार पूर्ण करून त्यांचे पार्थिव काल दि २३ जुलै रोजी पहाटे नंदुरबार येथे आणण्यात आले.
त्यांच्या तिघाही मुली व जावयांनी त्यांच्यावर संपुर्ण हिंदू शास्त्रानुसार अंतिम संस्कार प्रतिकाशी प्रकाशा येथे अंत्यसंस्कार करण्याचे ठरविले. नंदुरबार येथे वास्तव्यास आलेले त्यांचे जावाई निलेश इन्फ्रास्ट्रक्चर या फर्मचे संचालक श्री विलास शंकरराव पाटील यांनी आपले बंधू सर्वश्री प्रवीण, अरविंद, डॉ. घनश्याम, अविनाश व निलेश यांच्या सहकार्याने व नागपूर येथील मोठे जावाई डॉ गजानन बेहेरे तसेच गोवा येथील लहान जावाई श्री निलेश पाटील यांनी अंत्ययात्रा साठी संपूर्ण परिश्रम घेतले.
त्यानुसार कालच प्रतिकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकाशा येथिल तापी नदीच्या घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचे ठरविण्यात आले. खरे तर रुढी परंपरेनुसार मुलाने वडिलांच्या पार्थिवाला अग्निडाग देण्याचा प्रघात आहे. मात्र स्व. डी.डी.पाटील यांना मुलगा नसल्याने लहान मुलगी सौ. शितल विलास पाटील यांनीच ते उत्तरदायित्व निभावत वडिलांच्या पार्थिवाला अग्निडाग दिला.
प्रकाशा येथे करण्यात आलेल्या या अंत्यविधीत कोणत्याही प्रकारच्या लाकडांचा वापर न करता गोवऱ्यांमध्ये तूप व खोबऱ्याचा वापर करुन पार्थिवाचे अंत्यसंस्कार करण्यात आले. स्व. डी.डी. पाटील यांनी आयुष्यभर गुरू ची भूमिका साकारली आणि योगायोग गुरुपौर्णिमा च्या दिवशीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सदरच्या अंत्यविधीतून रुढी परंपरांना झुगारत पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने समाजातून कौतूक करण्यात आले.

