जळगाव : आई व भाऊ गावाला तर वडील रात्रपाळीच्या ड्युटीला असताना एका १७ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरातील हरिविठ्ठल नगरात आज शनिवारी सकाळी उघडकीस आली. रितेश गुलाबराव मोरे (वय १७) असे आत्महत्या केल्याची तरुणाचे नाव आहे. रितेश याच्या आत्महत्येचे कारण अजून तरी समजलेले नाही, मात्र लाॅक असलेल्या मोबाईलमधूनच काही तरी धागेदोरे मिळतील, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
रितेश हा पाण्याचे जार वाटप करण्याचे काम करायचा. शहरातील एका महाविद्यालयतही त्याने प्रवेश घेतला होता. वडील गुलाबराव सुकलाल मोरे एका फायनान्स कंपनीच्या कार्यालयात सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. शुक्रवारी त्याची आई व भाऊ असे दोघेजण धुळे येथे नातेवाईकांकडे गेले होते. तर वडील रात्रपाळीसाठी ड्युटीवर गेले होते. शुक्रवारी रात्री रितेश हा एकटाच घरी होता. त्याने साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
शनिवारी सकाळी सात वाजता वडील गुलाबराव मोरे हे ड्युटीवरुन घरी आले तेव्हा रितेश आतून काहीच प्रतिसाद देत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी शेजारी राहणाऱ्यांना बोलावुन घेत घराचा दरवाजा तोडला असता रितेश गळफास घेतलेल्या स्थितीत आढळुन आला. ही घटना पाहून वडील गुलाबराव मोरे यांना जबर धक्का बसला.