- आयुष्यात संस्कार व शिस्त ही प्रगतीची पाऊले असतात -जिल्हाधिकारी
- केसीईच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्घाटन
जळगाव – येथील खान्देश एज्युकेशन सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात आज (दि.09) विज्ञान मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे उपस्थित होते. विज्ञान मंडळाचे उद्घाटन झाल्यानंतर जिल्हाधिकारी ढाकणे यांची प्रकट मुलाखत घेतली.
विज्ञान मंडळाच्या उद्घाटनप्रसंगी दीपप्रज्वलन करताना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, प्रा.करुणा सपकाळे, प्रा.डॉ.श्रध्दा पाटील, प्रा.स्वाती बर्हाटे.
कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी उपप्राचार्या प्रा.करुणा सपकाळे तर विज्ञान विभाग समन्वयिका प्रा.स्वाती बर्हाटे या उपस्थित होत्या. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यानंतर विज्ञान मंडळ समिती प्रमुख प्रा.डॉ.श्रध्दा पाटील यांनी प्रास्ताविक व्यक्त केले. उद्घाटनाचा कार्यक्रम झाल्यानंतर इयत्ता 11 वी विज्ञान विभागाची विद्यार्थिंनी किरण पाटील हिने विद्यार्थ्यांकडून आलेल्या प्रश्नांच्या आधारे जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी बोलताना डॉ. ढाकणे म्हणाले की, संस्कारच आयुष्यात महत्त्वाचे असते. आईवडीलांनी दिलेल्या संस्काराच्या पायावरच आपल्या सर्वांचे भविष्य घडत असते. सुसंस्कारी व्यक्ती, ईश्वराप्रती भक्ती, प्रबळ इच्छाशक्ती आणि आपल्या ध्येयाप्रती पूर्ण समर्पण या गुणांचा समुच्चय तुमच्याकडे असल्यास तुम्हाला यश निश्चितच मिळेल. केवळ श्रीमंत व्यक्तीच पुढे जाऊ शकतात असे नाही तर जी व्यक्ती ध्येयप्राप्तीसाठी पूर्ण प्रयत्न करते ती जीवनात नेहमीच यशस्वी होत असते. शिक्षण घेताना सर्वात आधी हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, केवळ परिक्षा देण्यासाठी किंवा नोकरी मिळविण्यासाठी शिक्षण घेऊ नका तर आपल्या आतील आवाजाला ओळखा आणि त्याप्रमाणे मार्गक्रमण करा. प्रत्येक विद्यार्थ्याने वाचनाची आवड जोपासलीच पाहिजे. ‘वाचाल तर वाचाल’ या उक्तीप्रमाणे मोठमोठ्या व्यक्तींची आत्मचरित्रे वाचा आणि स्वतःमधील पॉझिटिव्ह एनर्जीवर विश्वास ठेवून वाटचाल करा, यश हात जोडून तुमच्यासमोर उभे राहिल.
कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी व समन्वयक एस.ओ.उभाळे यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन प्रा.शोभना कावळे तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ.श्रध्दा पाटील यांनी केले. कार्यक्रमाची यशस्वीतेसाठी विज्ञान मंडळ सदस्य प्रा. विनोद वैतकर, प्रा.प्रमोद भोई, प्रा.दिनेश महाजन, प्रा.मीनल पाटील, प्रा.निलिमा खडके, प्रा.विनोद पावरा, प्रा.राजेश साळुंखे, प्रा.आर.बी.ठाकरे, प्रा. राजेंद्र निकुंभ यांनी परिश्रम घेतले.
जिल्हाधिकारी यांची मुलाखत घेतांना किरण पाटील.