जळगाव, दि. 25 – जळगाव जिल्ह्यात जमीन महसूल आणि गौणखनिज उत्खननापासून मिळणाऱ्या महसुलाची वसुली वाढवावी. महसुल वसुलीचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण होईल यासाठी आतापासूनच नियोजन करावे. असे निर्देश नाशिक विभागाचे विभागीय महसुल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले.
येथील जिल्हा नियोजन सभागृहात विभागीय आयुक्त श्री. गमे यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, उपायुक्त अर्जुन चिखले, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी, उपविभागीय अधिकारी प्रसाद मते, कैलास कडलग, राजेंद्र कचरे, लक्ष्मीकांत साताळकर, विनय गोसावी, सीमा अहिरे, रामसिंग सुलाणे, उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, राजेंद्र वाघ, तुकाराम हुलवळे जिल्हा सुचना अधिकारी प्रमोद बोरोले, नगरपालिका प्रशासन अधिकारी जयप्रकाश पवार यांचेसह जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, जिलहाधिकारी कार्यालयातील विविध शाखांचे प्रमुख व इतर विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
गौण खनिजाची शास्त्रीय पध्दतीने मोजणी करून महसूल वाढीसाठी प्रयत्न करावेत. आवश्यक तेथे तंत्रज्ञानाची मदत घ्यावी. परवानगी पेक्षा जास्त गौण खनिजाचा वापर झाला असेल, तर संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अधिकाधिक मजुरांना रोजगार उपलब्ध करून देत मजुरांचे स्थलांतर रोखावे. वसुंधरा अभियानाची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी. या अभियानांतर्गत देशी वाणाच्या रोपांची लागवड करून त्यांचे संगोपन करावे. यासाठी नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद यांनी एलईडी बल्ब लावणे, हरितपट्टे निर्माण करण्यावर भर देण्याच्या सुचनाही त्यांनी केल्यात. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेतलेल्या अपात्र शेतकऱ्यांकडून रक्कम वसु ली, पाणीटंचाई, हद्दपार प्रकरणे आदिंचा त्यांनी यावेळी आढावा घेतला.
पुरवठा विभागाने ग्राम आणि तालुकास्तरावर समित्यांचे गठण करावे. तसेच प्रत्येक तालुक्यातून किमान आदर्श स्वस्त धान्य दुकान तयार करावे. मतदार यादीतील त्रुटींची पूर्तता करावी. अधिकाधिक मतदारांच्या छायाचित्रांचा समावेश करीत छायाचित्र ओळखपत्रांचे वितरण करावे, छायाचित्र मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याचे त्यांनी सांगितले. वाळू लिलावांसाठी ज्या ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला मिळणे बाकी आहे त्याचा पाठपुरावा करावा. 7/12 संगणकीकरणाचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी तालुकानिहाय कॅम्प लावण्याची सुचनाही त्यांनी केली.
जिल्हाधिकारी श्री. राऊत म्हणाले, महसूल वसुलीसाठी नियोजन करण्यात आले आहे. गौण खनिजाची अवैध वाहतूक रोखण्यासाठी पथके गठित करण्यात आले आहेत. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. तुकाराम हुलवळे यांनी निवडणूक, प्रसाद मते यांनी रोजगार हमी योजना, जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. सुर्यवंशी यांनी अन्नधान्य वितरण, राजेंद्र वाघ यांनी भूसंपादनाची सविस्तर माहिती दिली. यावेळी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, नायब तहसीलदार व जिल्हाधिकारी कार्यालयातील शाखा प्रमुख उपस्थित होते.
00000