बीड(प्रतिनिधी)- कोरोना संकटामुळे अडचणीत आलेल्या वृत्तपत्रांना आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी औरंगाबाद येथे संपादकांची गोलमेज परिषद घेऊन बदलत्या परिस्थितीत वृत्तपत्र अंकाची विक्री किंमत वाढवावी अशी भूमिका राज्यात पहिल्यांदाच उघडपणे मांडली. याबद्दल महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांचा शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांनी भेट घेऊन सत्कार केला. कोरोना काळात वृत्तपत्र वितरण व्यवसायासमोर निर्माण झालेल्या अडचणीवर सविस्तर चर्चा केली. कमी विक्री किंमतीमुळे व्यवसाय करताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याने वृत्तपत्रांनी अंकाची किंमत वाढवावी या भूमिकेला विक्रेत्यांनी पाठिंबा दिला.
बीड शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांनी बुधवार दि. 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांची भेट घेऊन वृत्तपत्राच्या विक्री किंमत वाढवण्याच्या भूमिकेचे स्वागत केले. कोरोना काळात वृत्तपत्र आर्थिक अडचणीत आले असुन अडचणीतून बाहेर निघण्यासाठी आणि आर्थिक स्थैर्यासाठी औरंगाबाद येथे राज्यातील पहिली संपादकांची गोलमेज परिषद घेतली आणि सध्याच्या परिस्थितीत वृत्तपत्रांच्या अंकाची विक्री किंमत वाढवण्याची भूमिका मांडली. याबद्दल विक्रेत्यांनी मुंडे यांचा सत्कार करुन पाठींबा दिला. ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते सुदाम चव्हाण, सुमुर्ती वाघिरे, परमेश्वर खरात, विद्याभुषण बेदरकर, गणेश भालेकर, प्रतिक भोंडवे, गणेश घोलप, अंकुश शेनकुडे आदिंनी वृत्तपत्र वितरण व्यवसायासमोर निर्माण झालेल्या अडचणींवर सविस्तर चर्चा केली. कोरोना काळात मागणी कमी झाल्याने आणि वृत्तपत्रांची किंमत कमी असल्याने घरोघरी जाऊन वृत्तपत्र वाटप करणे अडचणीचे होऊ लागले आहे. वाटप करणार्या मुलांना मागणी कमी असल्याने वाटप करणे परवडत नसल्याने मुलेच मिळत नाहीत. तर विक्रेत्यांनाही अंकाची किंमत कमी असल्याने कमिशन कमी मिळते. कोरोनाच्या काळात वसुली मोठ्या प्रमाणात थकली असल्याने वितरकांनाही हा व्यवसाय करताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वृत्तपत्रानीही किंमत वाढवली तर सर्वांचाच फायदा होईल अशी भूमिका मांडली. पहिल्यांदाच अंकाची किंमत वाढवण्याबाबत भूमिका मांडल्याबद्दल वितरकांनी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांचा सत्कार करुन भूमिकेला जाहीर पाठींबा दिला.