जळगाव,(विशेष प्रतिनिधी) – जामनेर तालुक्यातील अवैध वृक्षतोड करून विना पास वाहतूक करणाऱ्या ‘त्या’ वाहनाचा व अवैधरित्या वृक्षतोड बाबत आज तपासणी करण्यात आल्याने सदर लाकूड माल विना पासचा असल्याचे निष्पन्न झाले असून आता अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या त्या वाहनाचा शोध वनविभागाचे अधिकारी घेत असल्याचे उपवनसंरक्षक दिगंबर पगार यांनी आज ‘दैनिक नजरकैद’शी बोलतांना सांगितले.दैनिक नजरकैदच्या वृत्ताने व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कारवाईने जामनेर वनपरिक्षेत्रात अवैध वृक्षतोड सर्रास सुरु असल्याचे उघड झाले आहे.
याबाबत सविस्तर असे की, जामनेर तालुक्यात गेल्या अनेक महिन्यांपासून अवैध वृक्षतोड होत असल्याची ओरड होती याबाबत दैनिक नजरकैद ने काल दिनांक 29 रोजी पुराव्यानिशी बातमी प्रसिद्ध केली होती. लॉकडाऊन काळातही अवैध वृक्ष तोड होत असून दिवसा ढवळ्या वाहतूकही होत असल्याचे पहूर-वाकोद रस्त्यावरील “सॉ मिल” मध्ये लाकूड मालाचे भरले वाहन खाली करतांना देखील आढळून आल्याने जामनेर वनविभाग याकडे दुर्लक्ष असे वृत्त प्रकाशित केले होते.याबाबत जळगाव वनविभाग दिगंबर पगार यांच्याकडे ही या गैरप्रकाराची माहिती दिली होती.सदर प्रकार गंभीर असल्याचे लक्षात घेऊन तत्परता दाखवत जामनेरच्या अवैध वृक्षतोडी बाबत तात्काळ तपासाचे चक्र फिरवल्याने वाकोद नजीक असलेल्या “सॉ मिल”मध्ये चौकशी सुरु करून त्या वाहनाचा शोध सुरु करण्यात आला आहे.
उपवनसंरक्षक श्री.पगार यांच्या तत्परतेचे कौतुक
जळगाव वनविभागाचे उपवनसंरक्षक दिगंबर पगार यांनी जामनेर येथील अवैध वृक्षतोड वाहतुकीची गंभीर दखल घेत तत्परतेने तात्काळ चौकशीचे आदेश दिल्याने कौतुक होत आहे तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तत्परतेने जामनेर वनविभागाच्या झोपेचे सोंग घेतलेल्या अधिकारी कर्मचारी यांची झोप उडाली आहे.