ठाणे दि. २१: शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालके, गरोदर माता स्तनदा माता , आणि किशोरवयीन मुलींना पूरक आहार पुरवणे, आरोग्य तपासणी, लसीकरण संदर्भसेवा, आरोग्य शिक्षण, व पूर्व शालेय शिक्षण इत्यादी नित्याची कामे करत कोरोनाच्या लढ्यात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यासाठी अग्रेसर राहात अंगणवाडी, सेविका अर्थात पिंक आर्मी कोरोनाची लढाई लढत नित्याच्या सेवाही निरंतर देत आहेत.
ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प राबवला जातो. जिल्ह्यात १८५४ अंगणवाड्या कार्यरत असून शून्य ते सहा वयोगटातील १ लाख ३० हजार बालके आणि २१ हजार स्तनदा, गरोदर किशोरवयीन मुलींना सेवा पुरवण्यात येत आहे.
या काळात सहा महिने ते तीन वर्षापर्यंतची बालके, गरोदर व स्तनदा माता, व ११ ते १४ वयोगटातील शाळाबाह्य मुली यांना महिन्यातील २५ दिवसांसाठी घरपोच आहार पुरविण्यात येत असून अंगणवाडी सेविका गृहभेटी देऊन आहार देत आहेत. ३ ते ६ वर्षे वयोगटातील अंगणवाडीत जाणाऱ्या बालकांना सध्या अंगणवाड्या तात्पुरत्या सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद असल्याने पूरक पोषण आहार १५ जुलै पर्यन्त घरपोच दिला जाणार आहे. याशिवाय पात्र बालकांचे लसीकरण केले जात असून अंगणवाडी सेविका,आशा, ए.एन.एम.यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न दिसून येत आहेत. बालकांची वृध्दी सनियंत्रणा अंतर्गत बालकांची गृह भेटीद्वारे, वजन-उंची मोजमापे, आरोग्य बाबत विचारपूस, कुपोषित बालकांना अतिरिक्त आहार दिल्याचे खातरजमा करणे आदी कामे दैनंदिन पार पाडली जात आहेत.