स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान मंडळातर्फे गप्पा शास्त्रज्ञांशी
जळगाव – येथील खान्देश एज्युकेशन सोसायटीच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान मंडळातर्फे ‘गप्पा शास्त्रज्ञांशी’ या कार्यक्रमातंर्गत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर व ज्येष्ठ गणितज्ञ डॉ.मंगलाताई नारळीकर यांचा विद्यार्थ्यांशी संवादाचा कार्यक्रम आज (दि.16) सकाळी 10 वाजता संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मु.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी होते तर स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या करुणा सपकाळे यांची प्रमुख़ उपस्थिती होती. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना गणितज्ञ डॉ.मंगलाताई नारळीकर म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी गणित व विज्ञान या विषयांची भीती न बाळगता आपल्या दैनंदिन जीवनात गणित व विज्ञानाची काय सांगड घातली जाते ते अभ्यासून त्याचा विचार करावा. फक्त पुस्तकी ज्ञानाचा विचार न करता पुस्तकातील प्रत्येक वाक्याचा अन्वयार्थ तपासून त्याप्रमाणे ते लक्षात ठेवावे. क्रमिक पाठ्यपुस्तकांचा अभ्यास करताना त्याच सखोल विचार करत नवनवीन तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळवावी. आपल्या ज्ञानाचा वापर करून देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी कार्य करावे. त्यानंतर डॉ.जयंत नारळीकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की, स्वयंप्रेरणेतून स्वअध्ययन करत आपल्या स्वतःचा विकास विद्यार्थ्याने घडवायचा असतो. त्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात आपण वापरत असलेल्या प्रत्येक वस्तूमागील विज्ञान समजून घेणे गरजेचे आहे. जीवनात एक ध्येय निश्चित करून त्याला आपली प्रेरणा बनवून कार्य केल्यास निश्चितच यशप्राप्ती होईल. यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांना क्रिकेटवरील प्रश्न विचारुन याचे उत्तर तुम्हाला सापडल्यास माझ्या ईमेलवर ते स्वतः पाठवा असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विज्ञान मंडळाच्या अध्यक्ष डॉ.श्रध्दा पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान मंडळ सदस्यांनी परिश्रम घेतले.
















