मुंबई – कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील दारूची दुकाने गेल्या महिनाभरापासून बंद आहेत. दारूची दुकाने बंद असल्याने मद्यपींची चांगलीच गैरसोय होत आहे. दरम्यान राज्यातील मद्याची दुकाने सोशल डिस्टंसिंगचे पालन करून सुरू करण्यात येतील असे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिले आहेत.
आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधताना राजेश टोपे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, जर सोशल डिस्टंसिंगचे योग्य प्रकारे पालन होणार असेल तर दारूच्या दुकानांवर बंदी घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.’ मात्र ही दुकाने कधीपासून सुरू होतील, याबाबत आरोग्यमंत्र्यानी माहिती दिली नाही. यासंदर्भातील वृत्त “मनीकंट्रोल कॉम”ने दिले आहे.