रांची – झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन हे राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. २९ डिसेंबरला ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. शपथग्रहण सोहळ्याला आघाडीतील सर्व पक्षांचे (जेएमएम, आरजेडी आणि काँग्रेस) दिग्गज नेते उपस्थित राहणार असल्याचं मानलं जात आहे. सोरेन हे स्वतः दिल्लीत आज काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार असून, त्यांना सोहळ्यात सहभागी होण्यासाठी निमंत्रण देणार आहेत.
झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष सोरेन यांनी मंगळवारी रात्री राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. सोरेन यांनी रात्री पावणेनऊच्या सुमारास बाबुलाल मरांडी यांच्या झारखंड विकास मोर्चासह एकूण ५० आमदारांसह राज्यपाल मुर्मू यांची भेट घेतली आणि सरकार स्थापनेचा दावा केला. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे प्रमुख शिबू सोरेन, काँग्रेसचे झारखंड प्रभारी आरपीएन सिंह, आरजेडीचे नेते तेजस्वी यादव आणि काँग्रेसचे केंद्रीय निरीक्षक टी. एस. सिंहदेव आदी उपस्थित होते.















