जळगाव : रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशात तणाव निर्माण झाल्याने जगभरात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याच्या मागणीत वाढ झाली असल्याचं दिसून आले आहे. उत्तर महाराष्ट्रातील सुवर्ण नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावातही सोन्याच्या दरात उसळी पाहयला मिळाली. जळगाव नगरीत आज सोन्याचे दर जीएस टी सह प्रति 10 ग्रॅम 53500 पर्यंत जाऊन पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे
युद्ध रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रांसह प्रमुख देशांनी प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन सध्या कोणाचे ऐकण्याचा मनस्थितीत नाहीत. आज सलग दुसऱ्या दिवशी रशियन सैन्य युक्रेनमध्ये जोरदार हल्ले करत आहेत. या पार्श्वभूमीवर जगभरातील भांडवली आणि कमॉडिटी बाजारात गुरुवारी मोठी उलथापालथ दिसून आली होती.
जागतिक कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव थेट २१५० डॉलर प्रती औंस इतका वाढला होता. त्याचे पडसाद भारतात देखील उमटले. भारतीय कमॉडिटी बाजारात सोन्याने ५१५०० रुपयांची पातळी ओलांडली होती. गुरुवारी कमाॅडिटी बाजारात सोन्याचा भाव तब्बल १४०० रुपयांनी वाढला होता.
रशिया आणि युक्रेनमधील तणाव वाढल्यास सोन्याच्या दरात आणखी वाढ होईल,असे सांगण्यात येत आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार, सोने लवकरच 60,000 रुपये प्रति 10 ग्रॅमची पातळी गाठू शकते.














