नवी दिल्ली- स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची गेल्या काही वर्षांपासून मागणी होत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या अजेंड्यामध्येही त्याचा उल्लेख करण्यात आला होता. आज लोकसभेत सावरकरांना भारतरत्न देण्याबाबतचा प्रश्नही विचारण्यात आला. त्यावर भारतरत्न पुरस्कारासाठी अनेक शिफारशी येत असतात. मात्र सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी कोणत्याही औपचारिक शिफारशीची गरज नाही. योग्यवेळीच भारतरत्न पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला जातो, असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सावरकरांना भारतरत्न मिळणार की नाही? हे अजून गुलदस्त्यातच आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने आज लोकसभेत सावरकरांना पुरस्कार देण्याबाबतच्या प्रश्नावर हे उत्तर दिलं. भाजपचे मुंबईतील खासदार गोपाळ शेट्टी यांनी सावरकरांना भारतरत्न कधी देणार? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर सावरकरांना भारतरत्नन देण्यासाठी कोणत्याही औपचारिक शिफारशीची गरज नाही, योग्यवेळी निर्णय घेतला जाईल, असं केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. भारतरत्न पुरस्कार हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सावरकरांना भारतरत्न देण्याची घोषणा भाजपने केली होती. भाजपच्या निवडणूक घोषणापत्रातही त्याचा समावेश करण्यात आला होता. शिवसेनेनेही अनेकदा सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केलेली आहे. महाराष्ट्रातील हिंदूत्ववादी संघटना आणि पक्ष सावरकरांना आदर्श मानतात. अनेक हिंदूत्वावादी संघटनांचे कार्यकर्ते सावरकरांना जन्मठेप झालेल्या अंदमान निकोबरमध्ये जाऊन त्यांच्या स्मृतींना उजाळाही देत असतात.















