पाचोरा – सातगाव (डोंगरी) ता. पाचोरा येथे जि.प. अंतर्गत आयुर्वेदिक दवाखाना असून, जि.प.सदस्य मधुकर काटे यांनी दवाखान्यास भेट दिली असता त्यांना डाॅ. सी. डी. पाटील गैरहजर असल्याचे दिसून आले. तसेच अधूनमधून गैरहजर असतात अशीही माहिती मिळाली.
ग्रामीण भागात आरोग्याची सेवा तळागाळातील गरीब जनतेला मिळावी. यासाठी सातगाव येथे आयुर्वेदिक दवाखान्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. मात्र येथील डॉ. सी. डी. पाटील हे बऱ्याचवेळा गैरहजर राहात असल्याचे जि. प. सदस्य मधुकर काटे यांच्या निदर्शनास आले. काटे यांनी तात्काळ डी. एच. ओ. पाटोळे यांना फोन केला असता, त्यांनी सांगितले की, गेल्या पंधरा दिवसांपूर्वी संबंधित डॉ. पाटील यांना दररोज आपल्या आस्थापनेवर उपस्थित रहावे आणि जनतेची आरोग्य सेवा करावी. असे पत्राद्वारे निर्देश दिलेले आहेत. तरीसुद्धा आदेशाचे पालन होत नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. दवाखान्यातील शिपाई दिलीप वाघे हे रुग्णांना गोळ्या देत असल्याचे काटे यांच्या निदर्शनास आले. वाघे यांना विचारण्यात आले की, तुम्हाला गोळ्या देण्याचा अधिकार आहेत का ? तेव्हा त्यांनी नकार दिला. शिपायाच्या हातून दिल्या जाणाऱ्या गोळ्यामुळे जर एखाद्या रुग्णाचे कमी जास्त झाले तर यास जबाबदार कोण ? असा प्रश्न प्रत्यक्ष उपस्थित असणाऱ्यांनी केला. काटे यांनी मस्टर तपासले असता, काही तारखेच्या सह्या नसल्याचेही उघड झाले आहे. यावेळी श्रीमती एस. एस. नाईक आरोग्य सेविका उपस्थित होत्या. इमर्जन्सी पेशंट जर आले आणि त्यावेळेस डॉक्टर उपस्थित नसेल तर यास जबाबदार कोण ? अशा डॉक्टरांवर कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सदर दवाखान्याची चौकशी वरिष्ठांनी करावी अशी मागणी जि.प. मधुकर काटे व ग्रामस्थांनी केली आहे.