धरणगाव येथील व्याखानात वक्ते लक्ष्मण पाटील यांचे प्रतिपादन
धरणगाव – स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील भारत घडविण्याची जबाबदारी युवकांच्या खांद्यावर आहे. आजचा युवक हा समाज माध्यमांच्या आहारी गेला असून त्यास दिशा देण्याची जबाबदारी शिक्षकांवर असल्याचे प्रतिपादन युवा वक्ते लक्ष्मण पाटील यांनी केले. येथील पी. आर. हायस्कूलमध्ये आयोजित स्वामी विवेकानंद आणि जिजाऊ जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रा.बी.एन.चौधरी होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. पर्यवेक्षक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. जिजाऊंनी केलेल्या संस्कारातून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज घडले असे पाटील म्हणाले. युवकांनी माता, पिता, गुरुजन यांचा सदैव आदर करावा असा सल्ला त्यांनी दिला. सावित्री आईंनी शिक्षणाची कवाडं उघडली तर जिजाऊंनी स्वराज्याची स्वपने दाखवली. विवेकानंदांनी विश्व बंधुत्वाची द्वाही चारी दिशेला फिरवली हे त्यांनी सोदाहरण पटवून दिली. विवेकानंदांची देव, धर्म, देश विषयक भुमिका स्पष्ट करत आज त्याचीच देशाला गरज असल्याचे ते म्हणाले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक प्रा.बी.एन.चौधरी यांनी विवेकानंदांना अभिप्रेत असलेल्या युवकाची लक्षणे सांगितली. ज्याच्या चेहऱ्यावर तेज, शरीरात शकक्ती, मनात उत्साह, बुध्दीत विवेक, जीवनात शिस्त, गुरुजनांचा आदर, पालकांवर श्रध्दा, जीवनात निती आणि देवावर भक्ती असते तोच खरा युवक. खऱ्या युवकाचं चारित्र्य स्वच्छ असते. असा युवकच देश घडवू शकतो असं ते म्हणाले.
कार्यक्रमाला जेष्ठ शिक्षक आर. के. सपकाळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. के. बेलदारसर यांनी तर आभार प्रदर्शन एस.आर.बन्सी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एस. पी. सोनार, जी. आर. सुर्यवंशी, एन. आर. सपकाळे, वाय. पी. नाईक, मिलींद हिंगोणेकर, जितेंद्र दाभाडे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.