मुंबई प्रतिनिधी | आज दोन दिवसांच्या सुटीनंतर राज्य अधिवेशन पुन्हा सुरू झाले असून विरोधक सातत्याने वेगवेगळ्या मुद्यावरून ठाकरे सरकार विरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करताना दिसत आहेत. दरम्यान चाळीसगावचे भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी ‘सरकार हरवलं आहे’ अशा आशयाचा पोशाख परिधान करत आगळ्या वेगळ्या अंदाजात ठाकरे सरकार विरोधात रोष प्रकट केला आहे.
आज विधानसभाध्यक्षांची निवडणूक घेण्याची शक्यता असल्याने राजकीय वातावरण तापले आहे. यातच भाजपने आज अतिशय आक्रमक पवित्रा घेतला असून अधिवेशन सुरू होण्याच्या आधी विधीमंडळाच्या पायर्यांवर आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनात चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण हे देखील सहभागी झाले. त्यांनी टोपीसह आपल्या शर्टवर सरकार हरवले आहे असे नमूद केले होते. याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, राज्यात सध्या अनेक समस्या आहेत. शेतकरी तर समस्यांनी अक्षरश: हैराण झाले आहेत. मात्र त्यांना दिलासा देण्याऐवजी राज्य सरकारचे मंत्री भ्रष्टाचारात मग्न आहेत. या अधिवेशनात जनहिताच्या अनेक प्रश्नांवर चर्चा होणे अपेक्षित होते. तथापि, सरकारने प्रखर विरोधाच्या भितीमुळे अल्प काळाचे अधिवेशन घेतले. यामुळे आम्ही समस्या नेमक्या कुठे मांडाव्यात हा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे शेतकर्यांना खांद्यावरून नेण्याची वेळ आलेली आहे.
आमदार मंगेश चव्हाण यांनी याप्रसंगी शेतकर्यांच्या वीज बिलांचा मुद्दा देखील उपस्थित केला. ते म्हणाले की, अनेक शेतकर्यांच्या वीज जोडण्यात तोडण्यात येत असल्याने शेतकरी हतबल झाले असतांना सरकारला याचे काही एक देणेघेणे नाही. सरकारने शेतकर्यांना दिलासा द्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली.
















