नवी दिल्ली – नागरिकत्व कायदा देशातील नागरिकांच्या विरोधातील नाही. त्यामुळे देशातील जनतेला कुणीही भडकवू नये. विदेशी नागरिकांना आपल्या देशात बेकायदेशीरपणे राहण्याची मुभा द्यायला आपला देश म्हणजे धर्मशाळा नाही. कोणताही देश अशा घुसखोरांना कधीच थारा देऊच शकत नाही, असं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सुनावलं.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना नितीन गडकरी यांनी हे विधान केलं. आसाममध्ये एनआरसीच्या यादीत ज्यांचं नाव आलेलं नाही. त्यांच्याकडे कायदेशीर पर्याय आहेत. आसाममध्ये सातत्याने मतदारांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यावरून बांगलादेशी नागरिक बेकायदेशीररित्या भारतात घुसल्याचं स्पष्ट होतं. काँग्रेस आणि ओवेसी सारख्या नेत्यांना या बेकायदेशीर घुसखोरांना भारताचं नागरिकत्व द्यायचं आहे का? असा सवाल गडकरी यांनी केला.
आसाममध्ये बांगलादेशींची घुसखोरी झालेली आहे. या लोकांना नागरिकांना अधिकारही देण्यात आलेले आहेत. अशा लोकांविरोधात काही कायदा असू नये का? ज्या अल्पसंख्याकांचा पाकिस्तान आणि बांगलादेशात छळ झालाय त्यांनाच नागरिकत्व दिलं जात आहे. त्यात कोणत्याही भारतीयांचं नुकसान नाही, असं गडकरी यांनी सांगितलं.















