पाचोरा, (किशोर रायसाकडा) – तालुक्यात २३ मार्च रोजी पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्या पासून मी व माझे सहकारी स्वताच्या जीवाची पर्वा न करता व कुटुंबासाठी वेळ न देता ‘रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा’ मानून मनापासुन कोरोना बाधित रुग्णांची सेवा करित आहे, सध्या विघ्नहर्ता हाॅस्पिटल मधिल कोविड सेंटरमध्ये दाखल असलेले रुग्ण बरे झाल्यानंतर ३ जुलै पासून कोविड सेंटर काही कारणास्तव बंद करण्यात येणार असल्याची माहिती विघ्नहर्ता हाॅस्पिटलचे संचालक डाॅ.भुषण मगर यांनी रोजी पत्रकार परिषदेत दिली.
दोन सहकाऱ्यांना कोरोनाची लागण
सेवा भाव मनात असल्याने सेवा देतांना माझ्या दोन सहकाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली होती तरी देखील आम्ही हार न मानता सेवा अविरत सुरु ठेवली आहे.
६० रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे समाधान
आजपर्यंत विघ्नहर्ता कोविडसेंटर मध्ये ६० रुग्ण उपचार घेऊन बरे होऊन घरी परतले आहेत याचे आम्हाला समाधान वाटते. मात्र परीसरातील नागरिकांना कोविड सेंटरमुळे त्रास होत असल्याने काहींनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती.याबाबत प्रशासनाने किमान तक्रारदार व हॉस्पिटल प्रशासनासोबत बैठक घेणे अपेक्षित होते.मात्र प्रशासनाने तसे न करता केवळ बघ्याची भुमिका घेतली.कोरोना सारख्या गंभीर परिस्थितीत प्रामाणिक पणे सेवा देऊनही काही नागरिक व्हाट्सॲप द्वारे बदनामी करत असल्याने मला मनस्ताप होत असल्याचेही डॉ. भूषण मगर म्हणाले.
३ जुलै पासून कोविड सेंटर बंद करणार
सध्या विघ्नहर्ता कोविड सेंटरमध्ये काही रुग्ण उपचार घेत आहेत.ते बरे झाल्यानंतर ३ जुलैपासुन हॉस्पिटल प्रशासनाने कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.प्रशासनाने दुसऱ्या हाॅस्पिटलमध्ये कोविड सेंटर स्थलांतरित करावे असेही डाॅ.मगर यांनी सागितले. कोरोना सारख्या आजारासोबत लढण्याचे सर्वच डाॅक्टरांचे कर्तव्यच असल्याचे ते यावेळी म्हणाले.