औरंगाबाद – राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार देशाचे पंतप्रधान व्हावे अशी इच्छा अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी वेळोवेळी बोलून दाखवली आहे, तो धागा पकडून ‘ विधानसभेनंतर एकत्र आलो,महाविकास आघाडी स्थापन केली आणि महाराष्ट्र सोपा झाला, लोकसभेत जर आपण एकत्र लढलो व मराठी माणूस दिल्लीत गेला तर आपण सर्वांनी बघितलेले स्वप्न पुर्ण होऊ शकेल ‘ असे सांगत आमदार रोहित पवार यांनी शरद पवार यांच्या पंतप्रधानपदासाठीच्या चर्चेला सकारात्मक वाट करुन दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वक्ता प्रशिक्षण विभागाचे प्रदेशाध्यक्ष ख्यातनाम वक्ते प्रदीप सोळुंके यांचा मंगळवारी (४ फेब्रुवारी) आमदार रोहित पवार यांच्या हस्ते सेवा गौरव करण्यात आला. यावेळी पवार बोलत होते.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये झालेल्या या गौरव समारंभासाठी आमदार सतीश चव्हाण, आमदार अंबादास दानवे, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, शिक्षणाधिकारी बी.बी. चव्हाण तसेच कैलास पाटील, राजकुमार तांगडे आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. सेवागौरव पुरस्कार प्रदान करण्यात आल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना रोहित पवार आगामी लोकसभा, राज्यात काँग्रेस- राष्ट्रवादी आणि शिवसेनेची झालेली महा विकास आघाडी आणि पंतप्रधानपदावर बोलले, यावेळी ते म्हणाले की, साहेब अजुनही तरुण आहेत, आपण एकत्रित येऊ, एकत्रित लढू, महाविकास आघाडीमुळे महाराष्ट्र आता सोपा झाला, लोकसभेत पण आपण एकत्रित लढलो तर एक मराठी माणूस दिल्लीत गेला तर आपण सर्वांनी बघितलेले स्वप्न पूर्ण होऊ शकते असे म्हणत शरद पवार हे येणाऱ्या काळात पंतप्रधान होऊ शकतात असा विश्वास व्यक्त केला. प्रदीप सोळुंके यांच्याबद्दल बोलताना पवार म्हणाले की, प्रदीपदादांच्या भाषणामध्ये कधीही जातीवाद- धर्मवाद नसतो, थोर व्यक्तींचा खरा विचार शेवटच्या घटकांपर्यंत कसा पोचवता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले असल्याचेही पवार यांनी सांगितले.