मुंबई- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ते, तसेच संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी संघटनेच्या अध्यक्षपदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत शेट्टी यांना मोठा फटका बसला आहे.
तुपकर हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं वृत्त आहे. रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टी यांच्याकडे त्यांचं राजीनामा पत्र सादर केलं आहे. त्यात त्यांनी पक्ष सोडण्याचं कोणतंही कारण दिलेलं नाही. दरम्यान, तुपकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले आहेत. तुपकर हे गेली अनेक वर्षे शेट्टी यांच्या खांद्याला खांदा लावून शेतकर्यांच्या प्रश्नांवर लढत आहेत. कुशल संघटक म्हणूनही त्यांची ओळख आहे. मात्र ऐन निवडणुकीत त्यांनी शेट्टी यांची साथ सोडल्याने हा शेट्टी यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, रविकांत तुपकर आणि वंचितचे नेते गोपीचंद पाडळकर यांनीही भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिल्याने राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.