मुंबई – महाराष्ट्रातील राजकीय लढाईत पीछेहाट झाल्यानंतर भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. शरद पवारांनी भाजपवर डाव उलटवला अशी चर्चा असतानाच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी या घडामोडींवर मौन सोडलं आहे. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ पक्षनेते असल्यानं भाजपनं त्यांच्यावर विश्वास ठेवला होता,’ असं शहा यांनी सांगितलं.
निवडणूक निकालानंतर राज्यात तब्बल महिनाभर रंगलेल्या राजकीय नाट्याचा काल शेवट झाला. भाजपशी हातमिळवणी करून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या अजित पवार यांनी माघार घेऊन राजीनामा दिल्यामुळं भाजपचं सरकार अवघ्या ८० तासांत कोसळलं. त्यानंतर आता राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होत आहे. नव्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे उद्या शपथ घेणार आहेत.
चानक फिरलेल्या राजकारणावर पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी तूर्त काही बोलण्यास नकार दिला. ‘योग्य वेळी योग्य ते बोलेन,’ असं ते म्हणाले. मात्र, अमित शहा यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना यावर भाष्य केलं. ‘अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाचे नेते होते. सरकार स्थापनेसाठी कोणत्याही पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना होता. भाजपला पाठिंबा देताना राज्यपालांनी स्वत: त्यांच्याशी चर्चा केली होती. राष्ट्रवादीनं सुरुवातीला जेव्हा सरकार बनविण्यास असमर्थता व्यक्त केली होती. तेव्हा राज्यपालांना दिलेल्या पत्रावर अजित पवार यांचीच सही होती. आमच्या समर्थनासाठी त्यांनी दिलेल्या पाठिंबा पत्रावर देखील त्यांची सही होती. त्यामुळं आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला,’ असं ते म्हणाले. अजित पवारांवर आरोप असलेल्या कुठल्याही प्रकरणाची फाइल बंद करण्यात आलेली नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
















