नवी दिल्ली – राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि विराट कोहली यांच्यावर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. न्यूज एजन्सीनुसार, राष्ट्रीय तपास यंत्रणेला मिळालेल्या एका निनावी पत्रामध्ये हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. यानंतर दिल्ली पोलिसांनी मंगळवारी टीम इंडियाची सुरक्षा वाढवण्याचे आदेश दिले आहेत. एनआयएने हे पत्र नंतर बीसीसीआयला पाठवले आहे. भारत-बांगलादेश यांच्यातील तीन टी-20 सिरीजमधील पहिला सामना 3 नोव्हेंबरला दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाईल.
दिल्ली पोलीस सूत्रानुसार, एनआयएला मिळालेल्या पत्रामधील यादीमध्ये भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेता लालकृष्ण आडवाणी, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रमुख मोहन भागवत यांची नावे आहेत.
केरळची संघटना करू शकते हल्ला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केरळमधील कोझिकोड येथील, ऑल इंडिया लष्कर-ए-तोयबा नावाची संघटना या दिग्गज हस्तींवर हल्ला करू शकते. हे पत्र खोटेही असू शकते परंतु सुरक्षेच्या दृष्टीने याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. याच कारणामुळे स्टेडियम आणि सर्व खेळाडूंना जास्त सुरक्षा देण्यात आली आहे.















