चाळीसगाव – दडपण न घेता नियोजन करून अभ्यासात सहजसोप्या युक्त्या वापरल्यास यश मिळवता येते. पालकांनी मुलांवर आपल्या अपेक्षांचे ओझं न लादता आधी त्यांचा कल व रुची लक्षात घ्यावी, असा सल्ला चाळीसगाव येथील कार्यशाळेत मनःशक्ती प्रयोग केंद्रातर्फे देण्यात आला.
येथील चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती चंपाबाई रामरतन कळंत्री प्राथमिक विद्यालय व श्रीमती सरस्वतीबाई आवटे प्री-प्रायमरी स्कूलमध्ये मंगळवारी लोणावळा येथील मन:शक्ती प्रयोग केंद्रातर्फे चर्चासत्र व मार्गदर्शन सभा घेण्यात आली. विद्यार्थ्यांना अभ्यासातील यश व युक्त्या, पालकांसाठी सुजाण पालकत्व तसेच शिक्षकांसाठी ताणतणावमुक्ती या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या चर्चासत्रात मनशक्ती केंद्राचे साधक शिवेकर, चाळीसगाव येथील देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. मान्यवरांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद दायमा यांनी केले. विद्यार्थी, शिक्षक, पालकांनी मोठ्या संख्येने चर्चासत्राचा लाभ घेतला. सूत्रसंचालन दीपाली चोरट यांनी केले.