जळगाव- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्यावतीने ३ व ४ ऑक्टोबर रोजी मुळजी जेठा महाविद्यालयात दोन दिवसीय पहिले विद्यार्थी साहित्य संमेलन होत आहे. विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव दिल्यानंतर या प्रकारचे हे पहिलेच संमेलन होत आहे. खान्देश कॉलेज ऑफ एज्युकेशन सोसायटी या अमृत महोत्सवी वर्षात वाटचाल करणाऱ्या संस्थेच्या मुळजी जेठा महाविद्यालायातील बहिणाबाई साहित्य नगरीत हे संमेलन होत आहे. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात हे संमेलन होणार होते मात्र अतिवृष्टीमूळे ते स्थगित करण्यात आले होते.
गुरुवार, दि.३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८:३० वाजता काव्यरत्नावली चौक ते मु.जे.महाविद्यालय अशी ग्रंथदिंडी निघणार आहे. सकाळी १० वाजता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. प्रतिमा इंगोले यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील राहतील. प्रमुख अतिथी म्हणून सिनेअभिनेता राहूल सोलापूरकर व केसीईचे अध्यक्ष डॉ.नंदकुमार बेंडाळे असणार आहेत. सकाळी ११ वाजता राहूल सोलापूरकर यांच्याशी मुक्तसंवाद होईल. त्यानंतर दुपारी १ वाजता साहित्य संवाद अंतर्गत मान्यवर साहित्यिक हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून चांगले लिखाण असणाऱ्या व सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड करतील. सायंकाळी ५ वाजता खान्देशची लोकधारा अंतर्गत माहेरी आल्या बहिणाई हा कार्यक्रम होणार असून त्यामध्ये बोलीभाषेतील गाणी, उखाणे सादर केले जातील. रात्री ८:३० वाजता बालकवी ठोंबरे काव्यमंचावर कवीसंमेलन होईल.
शुक्रवार, दि.४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता सोशल मिडीया आणि तरुणाई या विषयावर विद्यार्थ्यांचा परिसंवाद होईल. त्यानंतर १० ते १२ या वेळेत कै.राजा महाजन कथामंचावर कथाकथन होईल. त्यानंतर १२ वाजता आम्ही काय वाचतो? या विषयावर परिसंवाद होईल. दुपारी २ वाजता साहित्य आणि समाज या विषयावर परिसंवाद होईल. दुपारी ३ ते ४ या कालावधीत कवी पुरुषोत्तम पाटील मंचावर फेसाटी कादंबरीकार व साहित्य अकादमी युवा पुरस्कार विजेते नवनाथ गोरे आणि सुप्रसिद्ध कवी सुशीलकुमार शिंदे यांची प्रकट मुलाखत होईल. सायंकाळी ४ वाजता प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर यांच्या अध्यक्षतेखाली या विद्यार्थी साहित्य संमेलनाचा समारोप होईल. यावेळी हैदराबाद येथील डॉ. जयंत कुलकर्णी व जळगाव येथील शशिकांत वडोदकर हे प्रमुख अतिथी असतील अशी माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष दिलीप पाटील, कुलसचिव भ.भा.पाटील, प्राचार्य उदय कुलकर्णी, विद्यार्थी विकास संचालक डॉ.सत्यजित साळवे, समन्वयक डॉ.विद्या व्यवहारे-पाटील यांनी दिली.