
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, माथडी कामगारांच्या व्यासपीठावर कोणताही राजकीय पक्ष ढवळाढवळ करणार नाही. चळवळीला ५० वर्षे पुर्ण झाली आहेत, यापुढेही असेच कार्य सुरू ठेवा. चळवळीतील अडचणी आम्ही दूर करू. माथाडी कामगारांच्या मुलांसाठी सरकार निश्चितच मदत करेल. तसेच, मराठा आरक्षणाच्या चळवळीला पाठिंबा देऊन सरकारने अण्णासाहेबांना मानवंदना दिली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणात म्हटले की, पहिल्यांदाच आज माथाडी कामगारांसमोर आलो आहे. एका बाजूला नरेंद्र आणि दुसऱ्या बाजूला देवेंद्र आणि मध्ये मी हा भावनिक सोहळा आहे. तो काळ लढाईचा काळ होता बाळासाहेब आणि अण्णासाहेब यांनी मुंबईत मराठी माणसांमध्ये संघर्षाची ताकद पेटवली. ते आपल्या अनुयायांशी प्रामाणिक राहणारे नेते होते. बाळासाहेब आणि अण्णासाहेब एकत्र आले, पण ते जर गेले नसते तर या महाराष्ट्र राज्याने पहिला माथाडी कामगार मुख्यमंत्री झालेला पहिला असता.
नुसती ओझी वाहू नका, तुमच्या हक्काचे सरकार आले पाहिजे. लोकसभेआधीच निर्णय घेतला असता तर नरेंद्र पाटील आज खासदार असते. आता याचा अर्थ साताऱ्याच्या जागेवर कलगीतुरा रंगणार असा लावू नका, तसे काही नाही. नेत्याचे निर्णय चुकले तर संपूर्ण चळवळ संपून जाते. आम्ही कधी कोणाशी सुडाने वागणार नाही. तुम्ही वाघनखे आहात, तुमच्या ताकदीवर ही चळवळ सुरू आहे. महाराष्ट्रची माती देशाला दिशा देते. माथाडी कामगार फक्त कामगार राहता कामा नये आता तो मालक ही झाले पाहिजे.
राज्यातील निवडणूक आम्ही जिंकणार आहोतच, राज्यात महायुतीचेच सरकार येणारच आहे, असा देखील त्यांनी यावेळी विश्वास व्यक्त केला. मात्र हे सर्व तुमच्या हातात असल्याचेही त्यांनी कामगारांना उद्देशून म्हटलं. ५० वर्षे झाली तरी माथाडी कामगार चळवळ यशस्वीपणे सुरूच ठेवल्याबद्दल त्यांनी नरेंद्र पाटील यांचे विशेष कौतुकही केले.
याप्रसंगी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील, आमदार शिवेंद्रराजे भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती.