जळगाव, (प्रतिनिधी) : भाजपमध्ये नाराज असलेले ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं खात्रीलायक वृत्त असून विजयादशमी किंवा त्याआधी खडसे सीमोल्लंघन करत भाजपला मोठा धक्का देतील अशी जोरदार चर्चा आहे.नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती.राषट्रवादी समर्थकांकडून तशी जोरदार वातावरण निर्मिती देखील केली होती.नाथाभाऊ आता राष्ट्रवादी प्रवेश करतीलच असे सर्वत्र वाटत असतांना प्रवेशाचा मुहूर्त मात्र टळल्याने आता विजयादशमीच्या अगोदर सीमाउल्लंघन करतील अशी चर्चा आहे.
खडसेंसह त्यांची कन्या रोहिणी खडसे-खेवलकर व अनेक आजी माजी आमदार, नगरसेवक, हे देखील पक्षांतर करतील याची दाट शक्यता आहे.त्यामुळे पक्षांतरानंतर सोबत येणाऱ्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांचे देखील योग्य पुनर्वसन होणे गरजेचं असल्यानेच नाथाभाऊ यांचा पक्ष प्रवेश लांबणीवर पडत असल्याचे जवळच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून समजते.
खासदार असलेल्या सूनबाई रक्षा खडसे काय निर्णय घेणार…
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी पक्ष प्रवेश केल्यास भाजपच्या तिकीटावर खासदार असंलेल्या सूनबाई रक्षाताई खडसे काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. लोकसभा निवडणुकीला दीड वर्ष झाले असून साडेतीन वर्षांचा खासदारकीचा कालावधी बाकी असतांना रक्षाताई खडसे काय निर्णय घेतील हे एकनाथराव खडसेंच्या पक्षांतरानंतरच समजेल हे मात्र खरे.
गेल्या काही दिवसांपासून नाथाभाऊ राष्ट्रवादी पक्षात पक्षप्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगत असल्याने भाजपवर सातत्याने दबाव येत होता. एकनाथ खडसे यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना गोव्याचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्याची चर्चा रंगू लागली आहेत.
कालचा गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सोबत खडसेंचा प्रवास…
बोरखेडा हत्याकांडातील परिवाराला सात्वनपर भेट देण्यासाठी काल गृहमंत्री अनिल देशमुख हे जिल्हयात आले असता एकनाथ खडसे हे गृहमंत्र्यांच्याच गाडीत बसून बोरखेडा गेले… एकाच गाडीत प्रवास केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या हे मात्र खरे.
राष्ट्रवादी प्रवेशाबाबत खडसेंकडून अद्यापही स्पष्टता नाहीच…
राष्ट्रवादी प्रवेशाबाबत अनेकवेळा पत्रकारांनी एकनाथ खडसे यांना विचारणा होत आहे मात्र अद्यापही त्यांनी राष्ट्रवादी प्रवेशाबाबत स्पष्टता दिलेली नाही.