मुंबई – महाराष्ट्रासह जगभरात आज मराठी भाषा दिन साजरा होत असून विविध स्तरांतील मान्यवर सोशल मीडियावरून मराठी दिनाच्या शुभेच्छा देत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी दिनानिमित्त एका काश्मिरी तरुणीचा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला आहे. ‘हा व्हिडिओ आपल्या राज्याला आपल्या वैभवाची जाणीव करून देवो, अशा शुभेच्छाही राज यांनी दिल्या आहेत. त्यांची ही पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
मराठी भाषा दिनानिमित्त राज ठाकरे यांनी सकाळीच फेसबुकवर पोस्ट टाकली होती. मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी, अशी सदिच्छा त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केली होती. ज्यांच्या जयंतीदिनीचं औचित्य साधून मराठी भाषा दिन साजरा केला जातो, त्या कवी कुसुमाग्रजांनाही त्यांनी एका पोस्टद्वारे अभिवादन केलं. कविता, नाटक, कथा, कादंबरी, लघुनिबंध असे विविध वाङ्मयप्रकार कौशल्याने हाताळत साहित्याच्या सर्व प्रांतात आपल्या प्रतिभेचा दरारा निर्माण करणारे कुसुमाग्रज हे मराठी साहित्य आणि संस्कृतीचा मानदंडच, असं म्हणत आपल्या पक्षातर्फे राज यांनी कुसुमाग्रजांना अभिवादन केलं आहे.















