जळगाव – कर्म आणि मर्म ज्याला उमगले त्या व्यक्तीचा प्रवास सार्थकी जीवनाकडे होऊ लागतो. हजारो मैल दूरहून खान्देशात आलेल्या आणि खान्देशच्या या भूमीलाच आपली कर्मभूमी बनवून विश्वास, स्नेह, पारदर्शकता, चिकाटीच्या बळावर शुद्धतेचे, मानवतेचे मर्म समजलेल्या रतनलाल सी. बाफना यांचा आजवरचा प्रवास देखील असाच सार्थकी झालेला आहे हे आज ठोसपणे सांगता येईल.
रतनलाल सी. बाफना यांचा जन्म ११ फेब्रुवारी १९३६ मध्ये राजस्थानमधील भोपालगढ येथे झाला. १९५४ मध्ये ते नोकरीच्या शोधात जळगावला आले. येथे एका स्वर्णपेढीत प्रामाणिकपणे व समर्पितपणे नोकरी करीत असतांना सेवेच्या काळात विविध प्रकारच्या ग्राहकांशी,माणसांशी त्यांचे जिव्हाळ्याचे व विश्वासाचे संबंध जुळलेत.अनुभवाचं भांडार भरत गेलं. सौजन्यशीलता आणि मधुर वाणीनं लोक संग्रह,परिचय व स्नेह दृढ होत गेलेत आणि नोकरीचा राजीनामा देऊन ते बाहेर पडले ते नव्या व्यवसायाची,नवं स्वप्नांची चैतन्यमयी ज्योत काळजात घेऊनच. १० मार्च १९७४ ला शुद्ध सोन्या-चांदीचं एक सकस निकोप बीज जळगावच्या भूमीत छोट्याशा २५० स्क्वेअरफूट जागेत ४ कर्मचाऱ्यांच्या सोबतीने रुजवलं गेलं रतनलाल सी.बाफना ज्वेलर्स या नावानं आणि रतनलाल बाफना यांच्या स्वतंत्र अशा आयुष्याला व्यावसायिक आयुष्याला सूर सापडला. दिशा लाभली. पाऊलं उचलली गेली. कल्पनेला मेहनतीच्या कुंचल्यातून आकार येत गेला. विविध रूपं घेऊन एक एक अलंकार कृती साकारत गेली. ग्राहकांचं देवता स्वरूप दर्शन घडू लागलं आणि हळू हळू ज्वेलरी व्यवसायाची वाटचाल वाढत गेली.
वाढत्या प्रतिसादामुळे १९८२ मध्ये शोरूमचे ५०० स्क्वेअर फुटाच्या जागेत नूतनीकरण करण्यात आले. जिल्ह्रात सर्वप्रथम नेकलेस विक्रीला सुरूवात झाली. २० कर्मचारी व ३५ कारागीर सोबतीला घेवून नेकलेसचे निर्माण व विक्री सुरू झाली. १९८८ मध्ये २००० स्केअर फुटाच्या जागेत जिल्ह्यातील सर्वात मोठे दिमाखदार “नयनतारा” भव्य शोरूम उभे राहिले. १९९५ ला ग्राहकांच्या वाढत्या प्रतिसादाने चांदीचे दागिने आणि भांडी यांच्यासाठी सिल्व्हर पॅलेस नावाचे स्वतंत्र दालन सुरू केले. १९९६ मध्ये चार विभागांच्या नयनतारा शोरूमच्या प्रत्येक दागिन्यांचे स्वतंत्र आठ विभागात विस्तारीकरण केले.
१९९६ मध्ये खान्देशातील एक मात्र चांदी भांड्यांच्या निर्मितीचा स्वतः चा कारखाना सुरू करण्यात आला. १९९७ मध्ये खान्देशातील पहिली गोल्ड रिफायनरी सेवा सुरू केली. १९९९ मध्ये बाहेरगावहून येणाऱ्या ग्राहकांच्या निवासासाठी निःशुल्क व्यवस्था व्हावी म्हणून “नयनतारा गेस्ट हाऊस” ची निर्मिती केली. २००५ मध्ये मराठवाड्यातील ग्राहकांच्या मागणीनुसार औरंगाबाद येथे १२००० स्क्वेअर फुटाच्या जागेत भव्य तीन मजली शो-रूमचा शुभारंभ करण्यात आला.याच शोरूमच्या शुभारंभानंतर रतनलाल सी.बाफना ज्वेलर्सला स्वर्णतीर्थ नावाची ओळख मिळाली आणि जिद्द,परिश्रम,निष्ठा आणि आत्मविश्वासानं एकेकाळची सेवक असलेली व्यक्ती आभूषणांच्या दुनियेतील भूषण म्हणून नावारूपाला आली. २००९ मध्ये नाशिक शहरात १५००० स्क्वेअरफुटाचे भव्य दिव्य प्रतिष्ठान सुरू करण्यात आले. जळगाव शहरातील सोने आणि चांदीचे वेगवेगळे शोरूम आणि औरंगाबाद नाशिक नंतरच्या शाखेनंतरही जळगावात ग्राहकांची गर्दी वाढतच राहिली त्या अनुषंगाने २०१२ मध्ये जळगावात पुन्हा स्वतंत्र शाखेचा शुभारंभ केला.
२०१५ मध्ये नांदेड शहरात आणखी एका शाखेचा शुभारंभ केला. थेट ग्राहकांच्या शहरात एकीकडे अनेक शाखांचा विस्तार वाढक्त राहिला पण तरीही महाराष्ट्र आणि बाहेरच्या राज्यातून ग्राहकांची गर्दीही वाढत राहिली. त्या अनुषंगाने २०१५ मध्ये महाराष्ट्रातील २५ शहरात तर २०१६ वर्षात महाराष्ट्रासह मध्यप्रदेश राज्यात सुवर्ण प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. याच प्रदर्शनाची संख्या २०१७ मध्ये ६० झाली. वर्ष २०१७ मध्ये रतनलाल सी.बाफना ज्वेलर्सने सोने दरात नवी क्रांती केली,ती म्हणजे दागिन्यांना शुध्दतेनुसार दर आकारण्याचा सुरुवात केली. २०१८ वर्षात ग्राहकांच्या दागिन्यांची काळजी घेण्याची वेगळी कल्पना येथे घेतली गेली.चोरी,लुटमार, घरफोडी सारख्या दुर्घटनेत दागिने गमविलेल्या ग्राहकांना त्यांच्या हक्काच्या रकमेची फ्री इन्श्युरन्स योजने अंतर्गत परतफेड देणारी योजना सुरू करण्यात आली.
देणे समाजाचे
ज्या समाजानं माझ्या सुवर्ण कलेचा गौरव केला,मला संपत्ती दिली, त्या समाजाचे माझ्यावर निश्चितच ऋण आहे.याच दृष्टीकोनातून रतनलाल सी.बाफना फाउंडेशन ट्रस्टच्या माध्यमातून समाज ऋण फेडण्याचा छोटासा प्रयत्न आजही निरंतरपणे सुरु आहे.
● शाकाहार प्रचार-प्रसार
शाकाहार प्रचार-प्रसार हा रतनलाल सी.बाफना यांच्या जीवनातील मुख्य उद्देश आहे. गावागावातील शाळांमध्ये जाऊन गरजू-गरीब ,होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश,वह्या,पुस्तके व शालेय साहित्य वाटप करून या चिमुकल्यांपर्यंत शाकाहाराचं महत्व पोहचविण्याचं काम त्यांनी केलं. जवळपास १००० गावांमध्ये निरंतर १० वर्ष फिरून त्यांनी शाकाहार विषयावर आपले मनोगत व्यक्त केले व मार्गदर्शन करून प्रबोधन केले.
●आजतागायत २८५० अपंग बंधू-भगिनींना तीन चाकी सायकल वितरित करण्यात आल्या आहेत.
● भुकेलेल्यांना अन्न
रतनलाल सी.बाफना फाउंडेशन ट्रस्ट व केशव स्मृती प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने जळगाव शहरात ना नफा ना तोटा या तत्वावर अल्प दरात गरजू,गरीब लोकांना भोजनाची व्यवस्था व्हावी म्हणून १९९२ सलात “क्षुधा-शांती झुणका भाकर केंद्राची” स्थापना केली.
● जलमंदिरांचे निर्माण
१९९० मध्ये जळगाव शहरातील मुख्य वर्दळीच्या ठिकाणी भव्य, सुसज्ज जल मंदिराची स्थापना करून हजारो लोकांना थंडगार, शुद्ध पाण्याची सोय करण्यात आली.
● रुग्णांना आर्थिक मदत
गरीब गरजू रुग्णांना आर्थिक मदत करण्याची परंपरा संस्थेकडून गेल्या २५ वर्षांपासून निरंतरपणे सुरू आहे.
● नेत्रपेढी ची निर्मिती
अल्प दरात डोळ्यांची तपासणी आणि शस्रक्रिया व्हावी आणि लोकांना मरणोत्तर नेत्रदान करता यावे म्हणून “मांगीलालजी बाफना नेत्र चिकित्सालय आणि नेत्रपेढीची स्थापना केली आहे. या कार्यात केशव स्मृती प्रतिष्ठान सहयोगी म्हणून काम बघते.
● अहिंसा तीर्थाची स्थापना
१९९८ मध्ये जळगाव पासून ६ किमी अंतरावर असलेल्या कुसुंबा गावानजीक “अहिंसा तीर्थ,रतनलाल सी.बाफना गोसेवा अनुसंधान केंद्राची’ स्थापना करण्यात आली आहे. इथे गायींच्या शेण आणि मूत्रावर रिसर्च करून अनेक प्रकारच्या औषधी बनविल्या जातात. कत्तलखान्यात जाणारे गोवंशाचे संवर्धन आणि संगोपन करण्यासाठी या केंद्राची स्थापना केली असून सध्या येथे ३००० गोवंश आहेत. हे केंद्र म्हणजे खान्देशातील एक पर्यटन केंद्र म्हणून नावारूपाला आले असून अनेक राज्यातील गो प्रेमी हे केंद्र बघायला येत असतात. शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करून जमिनीचा पोत सुधारावा आणि प्रदूषणमुक्त शेती करावी म्हणून येथे भव्य शेतकरी मेळावे घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते.
● विविध पुरस्कारांनी गौरव
सन १९९४ मध्ये शाकाहार व व्यसनमुक्ती साठी भारतीय गोवंश प्रतिष्ठान,दिल्ली च्या वतीने “रुषभश्री पुरस्काराने सन्मानित”
●जैन युवक संघ,पुणे द्वारे “शाकाहार पुरस्काराने सन्मानित”
●१९९७ मध्ये शाकाहार,प्राणी रक्षा व मानव सेवा या कार्याचा गौरव म्हणून भ.महावीर फाउंडेशन ट्रस्ट चेन्नई च्या वतीने डॉ.करणसिंह यांच्या हस्ते “भगवान महावीर अवार्ड” प्राप्त
●वर्ष १९९६ मध्ये व्यवसायातील प्रामाणिकता, गुणवत्ता व विकासाबद्दल तत्कालीन अर्थमंत्री मा. डॉ.मनमोहनसिंहजी भारत सरकार यांच्या हस्ते “जमनालाल बजाज उचित व्यवहार पुरस्काराने सन्मान.
●पशु रक्षा आणि अहिंसा या कार्यासाठी व्हेजिटेरियन सोसायटी मुंबई द्वारे “व्हेजिटेरियन ऑफ दी इयर” या अवार्ड ने १९९९ मध्ये गौरव.
●भारत जैन महामंडल, मुंबईच्या शाकाहार, अहिंसा, जीवदया व समाजसेवा या कार्यासाठी तत्कालीन पंतप्रधान मा. अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते “श्री जैन रत्न पुरस्काराने सन्मानित.
●२००८ वर्षी योगगुरू पू. रामदेव बाबा यांच्या हस्ते “द इंडियन व्हेजिटेरियन ऑफ द ईयर” पुरस्काराने गौरव.
●२००९ वर्षी गिरणा गौरव प्रतिष्ठान नाशिक द्वारे “गिरणा गौरव”पुरस्काराने सन्मान.
●गुजराथी समाज मुंबई द्वारा “महाराष्ट्र रत्न”पुरस्काराने सन्मानित.
●२०१६ वर्षी जोधपूर राजस्थान येथे “संबोधी रत्न” पुरस्काराने गौरव.
● आचार्य हस्ती अहिंसा अवार्ड
शाकाहार,अहिंसा,जीवदया,पशु-प्राणी रक्षा या कार्यात ज्या महंतांनी चांगके काम केले आहे, अशा मान्यवरांना रतनलाल सी.बाफना फाउंडेशनच्या वतीने दर वर्षी “आचार्य हस्ती अहिंसा अवार्ड” देऊन गौरविण्यात येते.आता पर्यंत देशभरातील ३५ मान्यवरांना स्मृती चिन्ह आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले आहे.या पुरस्काराची सुरुवातीला असलेली रक्कम ३१ हजारावरून आज ५ लाख रुपयांपर्यंत पोहचली आहे.













