जळगाव, (प्रतिनिधी) : फैजपूर प्रांत अधिकारी अजित थोरबोले यांची बदली झाली असून जिल्ह्यात ६ नुतन तहसीलदारांची नियुक्ती करण्यात आली यात मुक्ताईनगर, यावल, चोपडा आदी तालुक्यांसह जिल्ह्याधिकारी कार्यालयातील तहसीलदारांचा समावेश असल्याचे आदेश आज जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले.
आज खान्देशातील तहसीलदारांच्या बदल्या झाल्या. यात मुक्ताईनगर, यावल व चोपडा या तालुक्यांच्या तहसीलदारांच्या बदल्या झाल्या आहेत. यातील मुक्ताईनगरचे शाम वाडेकर हे नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे बदलीवर जाणार आहेत. यावल येथील जितेंद्र कुवर यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या तहसीलदारपदी बदली झाली आहे. तर चोपडा येथील अनिल गावित यांची देखील बदली झाली आहे.
बदली झालेले चोपडा तहसीलदार गावित यांच्या ठिकाणी नाशिक येथील करमणूक शाखेतून छगन वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुकेश हिवाळे हे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात करमणूक कर विभागाचे तहसीलदार म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. नगर येथील तहसीलदार महेश कौतिकराव पवार यांची यावल येथील तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली आहे. मालेगाव शहर येथून बदलून आलेले सुरेश वसंत थोरात याची जळगाव सामान्य प्रशासनात बदली झाली आहे. तर तळोदा येथून बदलून आलेले पंकज लोखंडे हे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल या विभागाचे तहसीलदार म्हणून पदभार सांभाळणार आहेत.