नवी दिल्लीः – निर्भयाः सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशी देण्याची तयारी पूर्ण झाल्याची माहिती तिहार कारागृहाच्या प्रशासनाने दिल्ली न्यायालयात दिली. तिहार कारागृह प्रशासनाच्यावतीने इरफान अहमद पातियाळा हाऊस न्यायालयासमोर हजर झाले. पातियाळा हाऊस न्यायालयात फाशी पुढे ढकलण्यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली असून, त्यावर सुनावणी सुरू आहे. निर्भया प्रकरणातील दोषींना उद्या, १ फेब्रुवारी रोजी फाशी द्यायची की नाही, यावर न्यायालय निर्णय देणार आहे.
इरफान यांनी न्यायालयाला सांगितले की, निर्भया प्रकरणातील दोषींपैकी विनय शर्मा यांची याचिका प्रलंबित आहे. अन्य कोणतेही प्रकरण न्यायप्रविष्ट नाही. त्यामुळे उर्वरित तीन जणांना फाशी दिली जाऊ शकते. दोषींना फाशी देण्याची तयारी पूर्ण झाली आहे. यात कोणतीही बाब बेकायदा नाही, असे त्यांनी यावेळी नमूद केले.
याचिकेवर सुनावणी सुरू असताना दोन्ही पक्षांच्या वकिलांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. या प्रकारावर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. निर्भया प्रकरणातील दोषी मुकेश सिंह यांच्या वकील वृंदा ग्रोवर न्यायालयात उपस्थित राहिल्याबद्दल वकिलांनी आक्षेप घेतला. यावरून वकिलांमध्ये वाद झाला.