शेतकर्यांसाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार – खडसे
जळगाव – हवामानावर आधारीत फळपीक विमा योजनेत विमा कंपन्यांच्या लाभासाठी निकष बदलवुन शेतकर्यांची फसवणूक करण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
मुक्ताई या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सांगितले की, राज्यात युतीचे सरकार असतांना जेव्हा मी कृषी मंत्री होतो तेव्हा शेतकर्यांसाठी हवामानावर आधारीत फळपीक विमा जाहीर केला. त्यात पेरू आणि लिंबूचाही समावेश होता. आताच्या फळपीक विमा योजनेतुन मात्र पेरू आणि लिंबू वगळण्यात आले आहे. तसेच 1 नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारी पर्यंतच्या कालावधीत सलग तीन दिवस 8 अंशापेक्षा खाली तापमान राहील्यास 33 हजार रूपये भरपाई दिली जात होती. आताच्या विमा योजनेत त्यात घट करून 25 हजार रूपये इतकी करण्यात आली. अधिक तापमानाच्या कालावधीत मार्च महिना समाविष्ट होता तो आताच्या योजनेत नसल्याचे खडसे यांनी सांगितले.
30 ऑक्टोबरपर्यंत शेतकर्यांनी जवळपास 350 कोटी रूपयांचा विम्याचा हप्ता भरला होता. दि. 31 ऑक्टोबर रोजी या योजनेचे निकष अचानकपणे बदलविण्यात आले. विमा कंपनीचा फायदा आणि शेतकर्याला अधिक भरपाई मिळू नये म्हणून प्रशासकीय यंत्रणेने यात सहकार्य केल्याचा आरोप एकनाथराव खडसे यांनी केला. यासंदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व कृषी मंत्री ना. दादाजी भुसे यांना पत्र पाठविले असुन त्यांची प्रत्यक्ष भेट देखिल आपण घेणार असल्याचे खडसे यांनी शेवटी सांगितले.